![]() |
माधव गडकरी |
आमच्या ब्रांकुशीच्या पक्ष्याने दि . २१ जून रोजी साठाव्या वर्षात प्रवेश केला. हे खरे कसे मानावे? 'ब्रांकुशीचा पक्षी' म्हणजे माझे जुने मित्र श्री. सदानंद रेगे व हे नाव त्यांच्या नव्या कवितासंग्रहाचे. या कवीच्या कवितेचे पाणी खोल आहे. तळ गाठणे तसे सोपे नाही. त्यांचीही दूरदर्शनवर काही दिवसांपूर्वी मुलाखत झाली. श्री. दिलीप चित्रे व श्री. सदानंद रेगे हे दोघे बोलले व श्री . रेगे यांच्या सच्च्या मित्राप्रमाणे श्री. शरद मंत्री यांनी तेथे बसून निमूटपणे ऐकले. श्री. दिलीप यांनी रेगे यांच्या कवितेतील व व्यक्तीमत्वातील अनेक गोष्टी त्या दिवशी खुलवल्या. परंतु एक गोष्ट खरी हा ब्रांकुशीचा नॉर्वेजियन पक्षी सांभाळणे फार कठीण आहे. त्याच्याशी केव्हा खटका उडेल याचा नेम नाही. परंतु मनाचा अतिशय प्रेमळ आणि खूप सोसलेला असा हा माणूस आहे. 'क्षितिज' नावाचे मासिक मी १९४८मध्ये काढले तेव्हापासून श्री. सदानंद रेगे यांच्याशी माझी मैत्री झाली. त्यांची कथा मिळविण्यासाठी मी मांटुग्याला जात असे. कधीकधी पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट कार्यालयात जाई. ते रुइया कॉलेजात पुन्हा शिकण्याच्या जिद्दीने आले तो काळ आज आठवतो. साहित्याचा खरा उपासक व मानवी जीवनाच्या कूट समस्यांचा भाष्यकार कवी म्हणून रेगे कवीतही वेगळे आहेत. 'पियानोच्या पोटात होता, ब्रांकुशीचा पक्षी, त्यानं सूर सूर सारे पंखात भरले, नि घेतलं एक सूर्यस्वी उड्डाण, त्रिमीतीच्या बुरूजावरून !' असे प्रा . सदानंद रेगे लिहितात .
'अक्षरवेल', 'गंधर्व' व 'देवापुढचा दिवा' या त्यांच्या तीन कविता-संग्रहांना महाराष्ट्र सरकारचे पुरस्कार मिळाले. कथालेखक रेगे नंतरच्या काळात पूर्णपणे कवितेत रमले. नॉवेच्या भेटीने एका नव्या काव्यविश्वाचा त्यांना परिचय झाला व त्यांच्या कवितेलाही नवा बहर आला. श्री. रेगे यांच्या कवितांचे प्रातिभाविश्व हे जबरदस्त आहे.
मराठी कवितेत रांगोळी किती तऱ्हेने आली. परंतु श्री. रेगे न्यायमूर्तीच्या घरासमोर रांगोळी काढण्यास बसले आहेत.
'यापुढे आम्हीच तुमची
न्यायपत्रे लिहित जाऊ.
तुम्ही फक्त तुमचा अंगठा
तेवढा मुकाट पुढे करायचा
नि आमच्या हातावरचं रक्त
लावून राजस मुद्रा ठोकायची .
एवढं कबूल करा,
न्यायमूर्ती,
तुमच्या दारापुढे रांगोळी काढू .
राखेला इथं काय तोटा ?'
No comments:
Post a Comment