रेगे, सदानंद शांताराम (२१ जून १९२३ ते २१ सप्टेंबर १९८२) कवी, कथाकार, अनुवादक. जन्म : राजापूर (जिल्हा- रत्नागिरी) येथे आजोळी. पुढचे सर्व आयुष्य मुंबईत.
१९४० साली दादरच्या छबिलदास हायस्कूलमधून मॅट्रिक झाल्यानंतर काही काळ जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये. परंतु परिस्थितीमुळे ते शिक्षण सोडून १९४२पासूनच नोकरीस सुरुवात. सुरुवातीला किरकोळ नोकऱ्या. १९५८ साली बी.ए.
१९५१ साली 'धनुर्धारी'त पहिली कथा. १९४८ साली 'अभिरुची'त पहिली कविता. हयातीत त्यांची २८ पुस्तके प्रकाशित झाली.
रेग्यांची कविता काहीशा विक्षिप्त, विदुषकी पद्धतीने विश्वाविषयीचे आपले आकलन कधी चिंतनशील होऊन, कधी भाष्य वा प्रतिक्रिया प्रकट करीत व्यक्त करते.

संक्षिप्त वाङ्मय कोश, पॉप्युलर प्रकाशन - यातून ही छोटीशी नोंद काढलेय. बाकीचं ब्लॉगमधील नोंदींमध्ये आहेच.

Friday, March 16, 2012

सदानंद रेगे यांची कविता

- विलास सारंग

सदानंद रेग्यांच्या कवितेचे एक वैशिष्ट्य, एक वेगळेपण म्हणजे तिच्यातील विमुक्त कल्पनाशक्ती. कल्पनाशक्ती सगळेच कवी वापरतात. परंतु प्रत्येक चांगला कवी आपल्या कल्पनाशक्तीला एका विशिष्ट, वैयक्तिक मुशीत टाकतो. एक विशिष्ट दृष्टिकोण, एक ‘व्हिजन ऑफ लाईफ’ त्याच्या साऱ्या कवितेतून व्यक्त होते. असे विशिष्ट ‘व्हिजन’ कवीच्या कवितेला एकसंधपणा, ठाशीवपणा देते. (त्यापायी एकसुरीपणा येण्याचाही धोका असतो.) सदानंद रेग्यांनी असे एकात्म ‘व्हिजन’ अंगीकारण्याचे सतत नाकारलेले दिसते. उदाहरणार्थ, मानवाने चंद्रावर पाऊल ठेवण्याचा विषय. दुसरा एखादा कवी आपल्या विशिष्ट ‘व्हिजन’मधून यावर एखादी कविता लिहील. परंतु रेगे वेगवेगळ्या दृष्टिकोणांतून या एकाच विषयावर पाच-सहा कविता लिहून जातात. कुठल्याही दृष्टिकोणाशी बांधिलकी न मानता शक्य तेवढ्या वेगवेगळ्या ‘अँगल्स’मधून ते विषयाचा वेध घेतात. एकच विषय घेऊन त्यावर अनेक कवितांची मालिका लिहिण्याचा हा प्रकार त्यांनी अनेकदा केलेला आहे. कोणत्याही मनोभूमिकेची बांधिलकी न स्वीकारता त्यांनी आपल्या कल्पनाशक्तीला पूर्ण स्वातंत्र्य दिले. या अर्थाने त्यांची कविता ‘विशुद्ध’ आहे. एका वेगळ्याच प्रकारची ‘विशुद्ध कविता’ त्यांनी मराठीत निर्माण केली.

यापायी सदानंद रेग्यांची कविता मर्यादितही झाली. श्रेष्ठ कवीच्या कवितेतून जसे एक व्यामिश्र परंतु एकात्म ‘व्हिजन’ प्रतीत होते, आवाहन देत राहते, तसे रेग्यांच्या कवितेबाबत होत नाही. त्यांच्या कवितेत फार विखुरलेपणा राहतो. दिलीप चित्रे, वसंत आबाजी डहाके, गुरुनाथ धुरी यांच्या कवितेले जसा ठाशीव चेहरामोहरा आहे, तसा सदानंद रेग्यांच्या कवितेला नाही. परंतु वर उल्लेखिलेल्या कवींच्या कवितेत बरेचदा जो एकारलेपणा आढळतो तो रेग्यांच्या कवितेत नाही. रेग्यांची कविता नेहमीच वेधक, ‘सरप्रायझिंग’ राहते, वाचकाचे कुतूहल जागृत ठेवते. रेग्यांची पुढील ओळ किंवा पुढली कविता कुठे भरारी (किंवा कोलांटी) मारील ते कधीच सांगता येत नाही.

रेग्यांच्या कवितेचे दुसरे एक वैशिष्ट्य म्हणजे तिच्यातील सर्वसमावेशक (एक्लेक्टिक) वृत्ती. ही ‘एक्लेक्टिक’ वृत्ती मराठीत मुळातच फारशी आढळत नाही. मर्ढेकर, विंदा करंदीकर यांच्या कवितेत ती दिसून येते, परंतु त्यानंतर ती अधिकच वेगाने लुप्त असल्यासारखे वाटते. ‘भारतीय (हिंदू) संस्कृती’, ‘मराठी परंपरा’, ‘आपली माती’ या घोषणांचा उच्चार अधिकाधिक कर्कश बनतो आहे. बहुतांश मराठी कविता आपल्या छोट्या वर्तुळात तीच-तीच वळणे गिरवीत बसलेली आहे. त्याबाहेर पडण्याची ईर्ष्या अभावानेच आढळते. अशा या वातावरणात सदानंद रेग्यांनी बेदरकार वृत्तीने सर्वत्र संचार केला. विषयांच्या निवडीत कसल्याही कोतेपणाला थारा दिला नाही. त्यांनी ‘चिनी’ कविता लिहिल्या; लाव्त्झूसाठी कविता लिहिल्या; ख्रिस्तावर, लझारसवर कविता लिहिल्या. एडवर्ड मंकसारख्या चित्रकारावर कविता लिहिली, ‘खुदा हाफीज’सारखी ‘इस्लामी’ कविता लिहिली. ‘भारतीय संस्कृती’, ‘आपली माती’ या कल्पनांचा त्यांनी कधीच बाऊ केला नाही. रेग्यांपाशी एवढी विमुक्त कल्पनाशक्ती, सर्वस्पर्शी कविवृत्ती असल्यानेच त्यांना हे शक्य झाले.

रेग्यांच्या कवितेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिच्यातील विनोद आणि ‘आयरनी’. गंभीर कवितेला विनोदाचे वावडे असते अशी गैरसमजूत मराठीत रूढ झाल्याचे दिसते. बहुतांश कविता ही ‘लांब चेहऱ्या’ची कविता आहे. ‘सीरियसनेस्’ म्हणजे ‘सॉलेम्निटी’ नव्हे आणि गंभीर जीवनदृष्टीला ‘कॉमिक व्हिजन’चे वावडे नसते हे फारसे लक्षात घेतले गेल्याचे दिसत नाही. याला दोन ठळक अपवाद म्हणजे अरुण कोलटकर आणि सदानंद रेगे. यांच्या कवितेतील गांभीर्य ‘कॉमिक’ वृत्तीला सामावून घेते. या दृष्टीने गेल्या काही वर्षांतील ‘सत्यकथे’तल्या रेग्यांच्या कविता पाहाव्यात. अलीकडे ‘सत्यकथे’च्या जवळजवळ प्रत्येक अंकात रेग्यांच्या कवितेतील निर्भर, विनोदी वृत्ती आणि अंकातल्या इतर बहुसंख्य कवितांमागील अतिगंभीर वृत्ती यांमधील विरोध मनावर ठसायचा. (१९८०-८२च्या दरम्यान.)

मराठी कवितेच्या कोंदट, कोत्या, ‘इनब्रीडिंग’ने कोळपलेल्या वातावरणात सदानंद रेग्यांची कविता हा एक मोकळा वारा होता. हा वारा आता वाहायचा थांबला आहे.

***
‘अभिरुची’च्या १९८२च्या दिवाळीतील अंकात हा लेख प्रसिद्ध झाला होता. रेगे ८२च्याच ऑक्टोबरमध्ये गेले. 

सारंगांच्या ‘अक्षरांचा श्रम केला’ (मौज प्रकाशन) ह्या पुस्तकात हा लेख (११४-११५) आहे. इथे हा लेख प्रसिद्ध करण्यासाठी सारंगांची फोनवरून परवानगी घेतली आहे. त्यांचे खूप आभार. मुळात लोकांनी मूळ पुस्तक घेऊन सगळं वाचावं.

Monday, March 12, 2012

काही कविता : १

रेग्यांच्या 'अक्षरगंधर्व' ह्या 'पॉप्युलर प्रकाशना'ने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकातील चार कविता इथे दिल्या आहेत, त्या केवळ उदाहरण म्हणून. मूळ पुस्तक घेऊन लोकांनी वाचावं.


शेवगा
फुलवुन पंखा
    शुभ्र फुलांचा
तुरा टपोरा
    तलम उन्हाचा
टाकित टाकित
    सुने उसासे
टिपे शेवगा
    धुंद कवडसे!

२१. ६.५४
***


घार
    पिवळी पिवळी
       जर्द दुपार
          सुनी नभाची
             गर्द कपार
                 आणि दूरवर
                    लावी हुरहुर
                       ठिपका होउन
                           एकच घार
                              एकच घार...
२१. ६. ५४
***


दोन आत्मचरित्रे
१-व्हॅन गॉव्...
मी
    व्हॅन गॉव्...
मी
सूर्यफुलांच्या शय्येवर
निजलों एका वेश्येला घेऊन
अन् दिला तिला
माझाच एक कान कापून...
ईS S S S
अखेर हिरव्या सांवल्यांच्या डोहांत
आत्महत्या केली मीं
तिची ती
उन्हाची
पिवळीजर्द... विवस्त्र किंकाळी ऐकून

२-पॉल् गोगाँ...
मी  
    पॉल् गोगाँ...
मी
माझा संसार
मातींत कालवला
अन् त्याला आकाशाच्या थडग्यांत पुरून
ताहितीच्या
काळ्या नागड्या मातीशीं
रंगरेषांचं मैथुन केलं!

२८. १०. ५५
***


उडाला तर कावळा...
उडाला तर कावळा
बुडाला तर बेडूक
    सदैव चघळावें
    हें व्यवहाराचें हाडूक
    अन् नाहींच जमला
    हा दोन दरडींचा डाव
    तर खुशाल काढावें दिवाळें
    नि व्हावें मोकळें
    फुंकून गांठचें किडूकमिडूक
कॉव्...कॉव्...
डराँव्...डराँव्...

७. ११. ५५
***

काही कविता : २

रेग्यांच्या या आणखी काही कविता, केवळ उदाहरणापुरत्या


फ्रान्झ काफ्का
म्हटलं
आज गादीला जरा
ऊन खाऊ दे.
गच्चीवर टाकली न टाकली तो
पसाभर ढेकूण
जीव घेऊन
सैरावैरा ढुंगणाला पाय
लावून धूम पळत सुटलेले.
तरी तीनचार पायाखाली आलेच.
त्यांच्या कुळथीच्या रंगाचे
रक्ताळ धूमकेतू
जमिनीवर गोंदणासारखे
उतरत्या सूर्याला साक्षी
ठेवून मी स्वत:शीच पुटपुटलो,
देवा, त्यांच्या आत्म्यांना शांती दे
त्यातला चुकून एखादा असायचा फ्रान्झ काफ्का!

(असंग्रहित)
 ***



साक्ष
या उजाड उनाड माळावर
माझ्या एकाकीपणाचा
एकच साक्षी...
डोळ्यांच्या खाचा झालेल्या
बुरुजाआड कण्हणारा
एक जखमी जहरी पक्षी…

‘गंधर्व’मधून
***



दुपार
या ग्रंथसंग्रहालयात
निःशब्दाच्या हातातील
ते कोरे पुस्तक
पहा कसे पेंगत आहे
डोक्यावरच्या या वेडपट पंख्याला मात्र
दुपारची कधीच
झोप येत नाही!
सूर्यफुलासारखी उमलणारी
उन्हाचा स्कर्ट घातलेली बॉबकट केलेली
ती मुलगी
केव्हापास्नं घुटमळते आहे
कवितासंग्रहाच्या कपाटांपाशी!
(पण तेही बेटे झोपी गेलेले दिसतात
ढाराढूर...)
समोरच्या टेबलावर बसलेला
आईन्स्टाईनसारखे केस पिंजारलेला
तत्त्वज्ञानाचा प्रोफेसर
घेतो आहे लिहून भराभर
झोपाळू बोटांनी
गलेलठ्ठ पुस्तकातले काहीतरी
झोपेला आलेल्या अक्षरांत...


बाहेर...
उन्हाच्या झाडाखाली
कलंडलेली सावली

घेऊ लागली आहे डुलक्या
अन् तिच्या हातांतली
ती पेंगुळलेली कादंबरी म्हणते आहे :
आता पुरे ग!
मला झोप येते आहे!

‘गंधर्व’मधून
***



शेवटी
सर्व वस्तुमात्र
पुसून टाकलं
तरी शेवटी
हात उरलेच
नि हातातलं
हे फडकं!

‘ब्रांकुशीचा पक्षी’मधून
***

Sunday, March 11, 2012

प्रस्तावना

‘निवडक सदानंद रेगे’ हे पुस्तक साहित्य अकादमीसाठी वसंत आबाजी डहाके यांनी संपादित केलंय. या पुस्तकाच्या प्रस्तावनेतला थोडासाच भाग डहाके यांच्या परवानगीने इथे दिला आहे. मूळ पुस्तक ९५ रुपयांना मिळतं. त्यात रेग्यांच्या काही कविता, कथा, लेख आहेत.

सदानंद रेगे यांचा जन्म २१ जून १९२३ रोजी राजापूर (जिल्हा- रत्नागिरी) येथे त्यांच्या आजोळी झाला असला तरी त्यांचे संबंध आयुष्य मुंबईत व्यतीत झाले. डिसेंबर १९३५मध्ये रेगे यांच्या वडिलांचे निधन झाले तेव्हा रेगे जेमतेम तेरा वर्षांचे होते. तिथून पुढे आई आणि भावंडांची जबाबदारी रेगे यांच्यावर पडली आणि ती त्यांनी विविध कष्ट उपसून पार पाडली. रेग्यांच्या वडिलांचे वाचन चांगले होते. त्यांनी आपल्या सुंदर हस्ताक्षरात विविध ग्रंथांची टिपणे काढून ठेवलेली होती. रेग्यांच्या हस्ताक्षरावर आणि चित्रकलेतल्या रसिकतेवर त्यांच्या वडिलांचे संस्कार झालेले आहेत. १९४०मध्ये मॅट्रिक झाल्यावर रेगे यांनी स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घ्यावा हे स्वाभाविकच होते. परंतु रंग, ब्रश, कागद इत्यादींचा खर्च आणि घरची स्थिती यांचा विचार करून त्यांना नोकरीच्या शोधात जावे लागले आणि चित्रकलेच्या शिक्षणाचा विचार बाजूला ठेवावा लागला. पुढे आयुष्याला स्थैर्य आल्यानंतर रेगे संगीताच्या आणि चित्रकलेच्या शिक्षणाकडे वळले. त्यांच्या काही पुस्तकांच्या मुखपृष्ठांवर त्यांनी केलेली रेखाचित्रे, रंगचित्रे आहेत. उदा. ‘ब्रांद’, ‘निवडक कथा’, इत्यादी. गिरणीत डिझायनर, केमिकल इंडस्ट्रीजमध्ये बिनपगारी उमेदवारी, पिशव्यांच्या कारखान्यात काम अशा फुटकळ नोकऱ्या केल्यानंतर त्यांनी पश्चिम रेल्वेत नोकरी धरली व ती अठरा वर्षे केली. १९५८ साली ते मराठी विषय घेऊन बी.ए. झाले आणि १९६१ साली ते इंग्रजी विषय घेऊन एम.ए. झाले. १९६२पासून २१ सप्टेंबर १९८२पर्यंत म्हणजे निधनापर्यंत त्यांनी रामनारायण रुईया महाविद्यालयात इंग्रजी विषयाचे प्राध्यापक म्हणून काम केले. या वीस वर्षांत त्यांची पंधराएक पुस्तके प्रकाशित झाली आणि विविध नियतकालिकांमधून विपुल असे स्फुट लेखन प्रकाशित झाले. हृदयविकाराचा झटका येऊन अल्पकालीन आजारानंतर त्यांचे निधन झाले. रेगे अविवाहित होते.

सदानंद रेगे यांच्या हयातीत त्यांची २८ पुस्तके प्रकाशित झालेली होती. त्यांच्या ‘अक्षरवेल’, ‘गंधर्व’, ‘देवापुढचा दिवा’ या कवितासंग्रहांना शासकीय पुरस्कार लाभला होता. रेगे यांच्या स्वतंत्र लेखनाप्रमाणेच त्यांनी केलेल्या अनुवादांनाही प्रतिष्ठा मिळाली. मायकॉव्हस्कीच्या ‘पँट घातलेला ढग’ या त्यांनी केलेल्या अनुवादित काव्यसंग्रहाला सोव्हिएत रशिया नेहरू पारितोषिक मिळाले होते. त्या निमित्ताने त्यांना १९७२मध्ये रशियाला जाण्याची संधी प्राप्त झाली होती. त्यापूर्वी १९६१मध्ये रेगे डॅनिश शिष्यवृत्ती घेऊन डेन्मार्कला गेले होते, नॉर्वेत काही काळ वास्तव्य केले होते. १९७८मध्ये इब्सेनच्या दीडशेव्या जन्मदिन महोत्सवात सहभागी होण्याचे निमंत्रण रेगे यांना मिळाले होते व या प्रकारे दुसऱ्यांदा नॉर्वेत जाण्याचा योग त्यांना प्राप्त झाला..

...

रेगे यांचे पहिले प्रकाशित पुस्तक म्हणजे दीनानाथ म्हात्रे यांच्या सहकार्याने त्यांनी केलेला स्टाइनबेक यांच्या ‘मून इज डाऊन’ या कादंबरीचा ‘चंद्र ढळला’ हा अनुवाद. तो १९४७ साली प्रकाशित झाला होता. पाठोपाठ स्टाइनबेकच्याच ‘पर्ल’चा ‘मोती’ हा अनुवाद १९५०मध्ये प्रकाशित झाला. रेगे यांचे पाश्चात्त्य वाङ्मयाचे वाचन चौफेर आणि अद्ययावत होते. कविता, कथा, कादंबरी, नाटक या वाङ्मय प्रकारातील लक्षणीय कृतींचे सरस अनुवाद त्यांनी केलेले आहेत. स्टाइनबेक, ऑर्वेल, लिन युटांग, मायकॉव्हस्की, वॉल्ट व्हिटमन, सॉफक्लीज, इब्सेन, युजीन ओनील, रुझिविच, लोर्का, नेरुदा, वॉलेस स्टीव्हन्स, इमेनेझ, खलिल जिब्रान इत्यादी लेखकांच्या निवडक कृतींची त्यांनी केलेली भाषांतरे पाहून त्यांनी वाङ्मयविषयक आस्था किती जबरदस्त होती याचा प्रत्यय येतो.

...

.. रेगे यांना साहित्य आणि कलांविषयी खोल आस्था होती. साहित्यिक, कलावंत यांच्याविषयी त्यांच्या मनात प्रेम होते, जिव्हाळा होता आणि भक्ती होती. त्यांच्या या भावनांचा आविष्कार विविध कवितांमधून झालेला दिसतो. मर्ढेकर, ठोंबरे, दिवाकर, केशवसुत, सार्त्र, काम्यू, काफ्का, मान्देलस्ताम, व्हॅन गॉफ, पॉल गोगँ, मॉदिन्लिआनी, सॉक्रेटिस, मार्क्स, मुंक, केसरबाई, गडकरी इत्यादी कविताविषय पाहिले की कलावंतांविषयी असलेल्या आस्थेचा प्रत्यय येतो. तसेच त्यांच्या लेखनातील संदर्भातूनही ही आस्था जाणवते. लिअर, हॅम्लेट, ऑफिलिया, केन, देवदास, इडिपस यांसारखे संदर्भ त्यांच्या कवितांतून सहजच येत राहतात. रेगे यांच्या कविताविश्वाचा हा एक घटक आहे. साहित्य किंवा चित्र या निव्वळ आस्वादाच्या गोष्टी नाहीत तर त्यांच्या संवेदनस्वभावाला घडवणारे व त्याचा अविभाज्य भाग असलेले घटक आहेत. पौर्वात्य आणि पाश्चात्य संदर्भ असलेल्या बाह्यतः मिश्र वाटणाऱ्या परंतु एकात्म असलेल्या वाङ्मयीन संस्कृतीचा ध्यास रेगे यांच्या मनाला लागलेला होता असे त्यांच्या विविध रचना पाहताना जाणवते.

...

१९५५च्या आसपास कथाकार म्हणून रेगे मराठी साहित्यविश्वात स्थापित झालेले असले तरी त्यांना खरा लौकिक मिळाला तो कवितेने. त्यांच्या कथांमधली काव्यात्मता आणि प्रतिमाव्यापार कवितेत सहज अंगभूत भाग म्हणून येऊन लागला. कवितेत रेग्यांना आपल्या लेखन स्वभावाचे मर्म सापडले.
सदानंद रेगे यांचा पहिला कवितासंग्रह ‘अक्षरवेल’ १९५७ साली प्रकाशित झाला.
.. त्यांचे काव्यलेखन १९४८पासून सुरू झालेले होते. तत्कालीन ‘अभिरुची’, ‘सत्यकथा’, ‘वाङ्मयशोभा’, ‘वसंत’ इत्यादी नियतकालिकांतून त्यांच्या कवितांना प्रसिद्धी मिळत होती. कल्पनाचमत्कृती, प्रतिमांचे नाविन्य, भाववृत्तींची सरलता, सूक्ष्मता ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये सहज जाणवतील अशी होती. ‘अक्षरवेल’ या संग्रहात प्रामुख्याने निसर्गकविता आहे. या कवितांमध्ये निसर्गाचे सुंदर शब्दात केलेले वर्णन नाही किंवा मानवी भावनांचा आरोप नाही. कवीच्या भाववस्थेत त्याला जाणवलेले निसर्गरूप प्रतिमांच्या भाषेत व्यक्त झालेले आहे.
उदाहरणार्थ-
आला श्रावण
गुच्छ रंगांचे घेऊन
ऊनपावसाचे पक्षी
आणि ओंजळीतून

इथे दृक्प्रतिमेतून श्रावण मूर्त होतो. पुढे या कवितेत ‘आता धरतील फेर / कवडशांची डाळिंबे’ अशी आणखी एक अनोखी प्रतिमा येते. श्रावणाचे रंगगंधात्मक वर्णन कवीने केलेले आहे, ते नुसते ‘सृष्टिसौंदर्य’ही नाही. याचे कारण कवितेच्या मध्यभागी पुढील ओळी आहेत.
आता मेल्या मरणाला
जिती पालवी फुटेल
गोठलेल्या आसवांना
पंख नवीन येतील

या ओळींमुळे ही केवळ निसर्गकविता राहत नाही तर कवीची एक भावस्थिती प्रकट करणारी कविता ठरते.

...

केवळ कल्पनाचमत्कृती हे रेगे यांच्या कवितेचे एकमेव वैशिष्ट्य नाही, त्यांच्या कवितांमधून अनुभव आणि विचार व्यक्त होतो, जीवनविषयक दृष्टी व्यक्त होते, ही दृष्टी सुखदुःखात्म आहे, या सुखदुःखात्म दृष्टीचे अनेक पैलू त्यांच्या कवितेतून व्यक्त होत असतात.
‘गंधर्व’ या कवितासंग्रहात ‘पोच’, ‘चित्र’, ‘तृप्त’ यांसारख्या प्रसन्न वृत्तीच्या आविष्कार करणाऱ्या थोड्या कविता आहेत. या संग्रहातल्या कवितांमधली मुख्य भावावस्था
वळणावरचा फकीर चाफा
त्याच्या मनात ठणकणारे
दुखरे गज्जल...

या ओळींतून व्यक्त झालेली आहे. तथापि याच संग्रहातल्या कवितांपासून कडवटपणाचे हास्यात रूपांतर करण्याची रेग्यांमधली प्रवृत्ती वाढीस लागलेली दिसते. या प्रवृत्तीचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘गंधर्व’ हीच कविता-
मी मरेन तेव्हा
येतील बाजाच्या पेटीतून
मोकळ्या हवेत
तीन झुरळी

अशी काहीशी विक्षिप्त सुरुवात असलेली ही कविता,
मी मरेन तेव्हा
वाचीन मी माझे धगधगते नाव
अश्रूंच्या फिरत्या तबकडीवर
सूरभिजली शाल पांघरून
निःशब्दाची

या ओळींवर येऊन थांबते. विक्षिप्तपणा, विदूषकी वृत्ती अथवा औपरोधिक दृष्टी हा रेग्यांच्या कवितेचा एक स्तर आहे. त्याखाली आयुष्यातला कडवटपणा, खोल दुःख लपलेले असते.

***

डहाकेंनी रेग्यांच्या कवितेसंबंधी जे प्रस्तावनेत लिहिलंय, त्यातला काही भाग इथे दिला आहे, मूळ प्रस्तावनेत रेग्यांच्या कथा, अनुवाद यांविषयीही डहाकेंनी लिहिलं आहे.

Friday, March 9, 2012

सदू आणि विंदा

- नामदेव ढसाळ


सदानंद रेगे आणि माझी अगदी जिगरी दोस्ती. सदूच मला विंदांकडे घेऊन गेला होता. त्यांच्या त्या ओझरत्या भेटीनेही मला कायम मोहीत केलं ते विंदांच्या मोकळ्याढाकळ्या वागण्याने. कुठेही लपवाछपवी नाही, ओठात एक पोटात एक असा व्यवहार नाही, जे आहे ते स्पष्ट आणि स्वच्छ! सदूच्या कवितांवर त्यांचे विशेष प्रेम. त्याच्या कविता ऐकल्यानंतर त्या शब्दकळांच्या प्रतिमासृष्टीवर विंदा इतके खूश होऊन जायचे की ते खुर्चीतून उठायचे, उभे राहायचे आणि म्हणायचे, "सदू, तुझे पाय इकडे कर पाहू...' असं म्हणत त्याला दिलखुलास मिठी मारायचे...

***

विंदा करंदीकरांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या आठवणी जागवणारा नामदेव ढसाळ यांचा मजकूर 'सकाळ'मध्ये १५ मार्च २०१०ला प्रसिद्ध झाला. या मजकुराची फक्त सुरवात इथे दिलेय ती केवळ संदर्भासाठी. मूळ मजकुराचा उद्देश आणि संदर्भ वेगळा असला तरी रेगे, करंदीकर, ढसाळ यांच्यासंबंधीचा अगदी थोडासा का होईना उलगडा या परिच्छेदावरून व्हावा एवढ्याचसाठी -

Thursday, March 8, 2012

अक्षरगंधर्व

सदानंद रेग्यांच्या स्मृतिदिवशी १९८७साली प्र. श्री. नेरुरकरांनी संपादित केलेलं नि 'पॉप्युलर प्रकाशना'ने प्रकाशित केलेलं 'अक्षरगंधर्व' हे पुस्तक प्रकाशित झालं. रेग्यांची नेरुरकरांनी घेतलेली मोठी मुलाखत. काही पत्रं, डायरीतील काही मजकूर असं या पुस्तकाचं स्वरूप आहे. आणि मुखपृष्ठावर दिसतंय ते चित्र रेग्यांनीच काढलेलं.

या पुस्तकातल्या मुलाखतीत रेग्यांनी थोडं त्यांच्या बालपणाबद्दल, नोकऱ्यांमधल्या उमेदवारीबद्दल, नॉर्वेला जाण्याचा नि तिथे असतानाचा अनुभव, साहित्याबद्दलची मतं, काही आजूबाजूची ओळखीची मंडळी, अशा कित्येक गोष्टींबद्दल मारलेल्या गप्पा आहेत. या मुलाखतीतला अगदीच थोडासा मजकूर खाली दिला आहे. या मजकुरावरून एकूण अंदाज कोणी बांधू नये हे तर आहेच कारण ब्लॉग बनवणाऱ्याने त्याच्या डोक्यानुसार हा मजकूर निवडलाय, पण तरी काही एक अंदाज येईल असं वाटल्यामुळे हा मजकूर इथे देत आहे --
***

रेगे- कोणत्याही प्रकारचा समाज. कोणत्याही प्रकारचा समाज जरी घेतला तरी, आमच्या कॉलेजमध्ये एकवीस वर्षे मी काम करतोय. तिथल्या शिक्षकांत किंवा तिथल्या विद्यार्थ्यांमध्ये मी समरस होऊ शकलो नाही. कारण असं की तिथं जे प्रकार चालतात ते धादान्त खोटे आणि पोट भरणारे प्रकार आहेत. तिथं कुणीही मनापासून शिकवत नाही. कारण त्या त्या विषयातील शिक्षक... माफ करा. मला हे बोलावं लागतंय... कारण माझा अनुभव... की त्यांना त्या त्या विषयाचा श्रीगणेशासुद्धा माहीत नसतो. फिजिक्सच्या मास्तराला विचारलं की फिजिक्स म्हणजे काय हे पाच मिनिटांत तू मला सांगू शकशील काय? तर तो हसतो आणि खांदे उडवतो. वाङ्मयाच्या प्राध्यापकाला जर म्हटलं की वाङ्मय म्हणजे काय? तर ते त्याला धड सांगता येत नाही. तर अशी ही स्थिती असल्यामुळे त्या शिक्षकावरही विश्वास नाही. ते हे जे शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात, त्यांना अर्थातच त्यामुळे विषयातलं मूलगामी ज्ञान कधीच मिळत नाही, चार वर्षांत आणि सहा वर्षांमध्ये... तेव्हा फक्त आम्ही स्टॅम्प लावून त्यांना डिग्र्या देतो. याच्या पलीकडे काही नाही. त्या समाजातही मी मिसळू शकलो नाही. साहित्यिकांच्या समाजातही मी मिसळू शकलो नाही. तर तिथे हाच प्रकार मला आढळला की वेगवेगळ्या प्रकारच्या गँग्स तयार करणं. वेगवेगळ्या प्रकारची रॅकेट्स तयार करणं.
नेरूरकर- लॉबी.
रेगे- लॉबीज्.. या तयार करणं. कारण तुम्ही बघा की दोन-दोन तीन-तीन वर्षांनी तुमचे साहित्यिक... (हसून) साहित्यिकांचे देवत्व पावणारे जे साहित्यिक आहेत, ते बदलत गेलेले आहेत. जर तुमचा एखादा चांगला साहित्यिक असेल तर तो कायमचा चांगला साहित्यिक का राहात नाही? तर दर सहा महिन्यांनी किंवा वर्षांनी तुमची दैवतं का बदलतात? हा एक प्रश्न आहे. त्याचं सरळ उत्तर असं आहे की रॅकेट्स आहेत. तर या रॅकेट्सचासुद्धा कधी मी भाग होऊ शकलो नाही. कारण त्यातला जो व्यवहार व धूर्तपणा आहे तो माझ्या मनाला परवडण्यासारखा नाहीय. मी असं म्हणत नाही की मी मोठा सच्चा किंवा मीच त्यातला खरा असं म्हणत नाहीय पण माझ्या स्वभावाच्या मर्यादा तुम्हाला सांगितल्या.
---

रेगे- कारण एकच शब्द घेऊन त्याचे अनेक अर्थ लावून किंवा अनेक अर्थ न लावून.. प्रत्येक शब्द हा... क्षेत्राक्षेत्राकडे त्याचा अर्थ बदलतो... मनुष्य म्हणून माझ्या भोवती समाज आहे. या समाजात मी जन्माला आलो आहे. मी अगदी रानात गेलो तरी हा समाज विसरू शकत नाही. रानात गेलो तरी जीवनावश्यक गोष्टी आहेत, त्या मी घेऊन जाणारच. मी समाज नेणारच. समाजाला कोणता मनुष्य टाळू शकत नाही. कारण मनुष्य हा समाजातलाच प्राणी आहे. तो समाजाचा असतोही आणि नसतोही. हो की नाही?

... तर आता माझी बांधिलकी जी समाजाची आहे ती मी टाळू शकत नाही. पण ती कोणत्या प्रकारची आहे? माझे नातलग आहेत. आईला मी आई म्हणावं, बापाला मी बाप म्हणावं. आपुलकी आहे ती कुणी माझ्या शिरावर ठेवलेली नाही. किंवा ममाझे भाऊ आहेत. माझे नातलग आहेत. मित्र आहेत. माझे शेजारी आहेत. माझं गाव आहे. माझ्या भोवतीचा समाज आहे. ही जाणीव ठेवून मी आहे. आणि त्या समाजाशी कृतज्ञता... त्याने माझ्यासाठी जे केलं आहे, ते मनात ठेवणं आणि जे करता येईल तेवढं करणं हे मी मानतो- न मानलं तरी मला त्याच्यापासून टाळता येणार नाही. असं आहे, मी एक कलावंत म्हणून काही समाजाचा घटक नाहीय. मी समाजापेक्षा थोडा वेगळा आहे. कारणी मी विशेष मनुष्य आहे- कलावंत म्हणून. तर कलावंत म्हणून माझं जे काम आहे... माझं काम... समजा, मी लेखक आहे... शब्द हे माझं माध्यम आहे, शब्द हे माझं साधन आहे. जे जे काही मला व्यक्त करायचं... आता इथेसुद्ध लोक घोटाळा करतात... व्यक्त करणं, कम्युनिकेट करणं यांचा आपण अनेक प्रकारे अर्थ लावतो. समजा, मी माझ्या गावातल्या एका नातेवाईकाला पत्र लिहिलं : ‘इथं असं असं जीवन आहे, तिथं कसं काय आहे? तुझी शेतीवाडी वगैरे माहिती...’ माझी माहिती मी पुरवतो. हे एक प्रकारचं कम्युनिकेशन झालं. म्हणजे इन्फर्मेशन... विचार... ज्ञान... हे कम्युनिकेशन. पण समजा, मी एक फुलाचं चित्र काढलं... त्या वेळेला मी काय कम्युनिकेट करीत असतो? तर ज्या अर्थी मी पत्र लिहितो त्या अर्थी मी कम्युनिकेट काही करत नाही. कुणाला काही सांगायचंय म्हणून मी फुलाचं चित्र काढलंय असंही काही नसतं. तर तो जो कागत आहे किंवा कॅनव्हास आहे, त्या कॅनव्हासवर मला उपलब्ध असलेली जी लिमिटलेस स्पेस आहे त्याच स्पेसमध्ये... म्हणजे शून्य जे माझ्यासमोर आहे, त्या शून्यामध्ये मी माझ्या माध्यमाद्वारे- शब्द- मला जे काही कागद उपलब्ध आहेत, त्या कागदामध्ये एक पॅरॅग्राफ मी लिहितो. हे शब्द मी त्या चौकटीत आणतो. शब्दांची विशिष्ट प्रकारे रचना करतो. चित्रकार हा भौमितिकक आकार, रंगांच्या पोती... या सगळ्या एकत्र आणून आकार निर्माण करतो. तो अॅबस्ट्रॅक्ट असेल. तो सघन असेल. काँक्रीट असेल... ते सोडून द्या. माझ्या कौशल्याच्या प्रमाणात ते मी करू शकेन. कौशल्याच्या पलीकडे जाऊन मी ते करू शकेन. कलावंत म्हणून माझं काम काय, तर माझ्या माध्यमाशी मी प्रामाणिक असणं, आणि शक्य तर त्या माध्यमाच्या ज्या काही पारंपरिक मर्यादा आहेत, त्या मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न करणं. हे माझं कलावंत म्हणून काम आहे. कुणाला काही सांगायचं आहे म्हणून मी लिहीत नाही. सांगायचं असेल तर मी सरळ सांगेन की, हा समाज बदलला पाहिजे. जातिवाद नष्ट झाला पाहिजे. ब्राह्मण किंवा उच्चभ्रू लोकांनी खालच्या दलितवर्गामध्ये मिसळलं पाहिजे. हे करायलाच पाहिजे. याच्याशिवाय गत्यंतर नाहीच आहे. पण हे सांगण्यासाठी काही मी गोष्ट लिहिणार नाही... सांगायचं असेल तर. वातावरणात जर मी सहजता गेलो. तिथे मला काही नवीन... दुसरं म्हणजे अनुभवाच्या बाबतीतसुद्धा... कोणताही लेखक कोणताही अनुभव नवीन सांगू शकत नाही. कारण नवीन अनुभव असा असूच शकत नाही. कारण जशी इतरांना शरीराच्या, मनाच्या मर्यादा असतात तशा कलावंतालाही असतात. आणि इतर लोक जे अनुभव घेतात तेच कलावंत घेत असतो. पण तो नवीन का होतो? हा अनुभव नवीन ठरू शकतो, कारण त्यात वापरलेले शब्द, त्यांची अभिव्यक्ती, ही त्या अनुभवाला नवीन करते..

सदानंद रेगे

Wednesday, March 7, 2012

Rege in an international anthology


Ecco (an imprint of HarperCollins) published The Ecco Anthology Of International Poetry in 2010. The anthology is edited by Ilya Kaminsky and Susan Harris of Words without Borders and it includes some of the greatest poets of 20th century. 

The anthology includes two Indian poets : one is Rabindranath Tagore (with whose poem the anthology begins) and the other Indian poet is Sadanand Rege.

To browse through the book click here.

Sadanand Rege's poem 'Old Leaves From The Chinese Earth' (translated by Dilip Chitre) is a part of this anthology. 

The poem follows below --


Old Leaves From The Chinese Earth

(I bought a Chinese book at a second-hand book shop. I got a man who spoke Japanese to explain it to me. All that I could make of it is what follows.)


I am Chiang Liang.
Once I was crossing the bridge,
And an old man was sitting there.
And as soon as he saw me,
He took off one of his shoes
And threw it deliberately into the river,
And said to me:
My good fellow,
My shoe has fallen into the river,
Please fish it out for me.
I was furious.
But i curbed my temper
And jumped into the water.
As soon as I had come up with the shoe,
He threw the other into the river.
‘Oh, there goes the other one too.’
I dived into the water again
And came back with the second shoe,
When he threw the first one back into the river.
I was furious. He said:
Meet me here again after thirteen years.

After thirteen years
There was no one on the bridge.
Only the sun blared down on it,
The size of a tiger’s jaw.
I waited a long time for the old man.
Then I came down and looked into the water:
There was my own face behind the sun,
There was nobody on the bridge except the sun.
But someone spoke out of my bones:
One shoe is life, the other is death.
I recognized the voice.
***



Tuesday, March 6, 2012

Horses

This poem of Sadanand Rege is translated by Dilip Chitre


An alloy of iron and bronze
Brushes a menstruating mane against the Sun . . .

Eagle's wings blaze out in the feet
Controlling a sky that slips out of a bowl of sound . . .

The stag from the moon stands on the cliff of the eyes
Caressing the downy storm in the blood . . .

A prolific neighing cracks the sky open
And a jewel gleams in the raised hood of the fifth note

Monday, March 5, 2012

ब्रांकुशीचा पक्षी

माधव गडकरी
माधव गडकरी 'मुंबई सकाळ'मध्ये संपादक म्हणून होते. तेव्हा ते लिहित असलेलं 'चौफेर' नावाचं सदर गाजलेलं. त्या सदरात २३ जून १९८२ रोजी प्रसिद्ध झालेला मजकूर -

आमच्या ब्रांकुशीच्या पक्ष्याने दि . २१ जून रोजी साठाव्या वर्षात प्रवेश केला.  हे खरे कसे मानावे? 'ब्रांकुशीचा पक्षी' म्हणजे माझे जुने मित्र श्री. सदानंद रेगे व हे नाव त्यांच्या नव्या कवितासंग्रहाचे. या कवीच्या कवितेचे पाणी खोल आहे. तळ गाठणे तसे सोपे नाही. त्यांचीही दूरदर्शनवर काही दिवसांपूर्वी मुलाखत झाली. श्री. दिलीप चित्रे व श्री. सदानंद रेगे हे दोघे बोलले व श्री . रेगे यांच्या सच्च्या मित्राप्रमाणे श्री. शरद मंत्री यांनी तेथे बसून निमूटपणे ऐकले. श्री. दिलीप यांनी रेगे यांच्या कवितेतील व व्यक्तीमत्वातील अनेक गोष्टी त्या दिवशी खुलवल्या. परंतु एक गोष्ट खरी हा ब्रांकुशीचा नॉर्वेजियन पक्षी सांभाळणे फार कठीण आहे. त्याच्याशी केव्हा खटका उडेल याचा नेम नाही. परंतु मनाचा अतिशय प्रेमळ आणि खूप सोसलेला असा हा माणूस आहे. 'क्षितिज' नावाचे मासिक मी १९४८मध्ये काढले तेव्हापासून श्री. सदानंद रेगे यांच्याशी माझी मैत्री झाली. त्यांची कथा मिळविण्यासाठी मी मांटुग्याला जात असे. कधीकधी पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट कार्यालयात जाई.  ते रुइया कॉलेजात पुन्हा शिकण्याच्या जिद्दीने आले तो काळ आज आठवतो. साहित्याचा खरा उपासक व मानवी जीवनाच्या कूट समस्यांचा भाष्यकार कवी म्हणून रेगे कवीतही वेगळे आहेत. 'पियानोच्या पोटात होता, ब्रांकुशीचा पक्षी, त्यानं सूर सूर सारे पंखात भरले, नि  घेतलं एक सूर्यस्वी उड्डाण, त्रिमीतीच्या बुरूजावरून !' असे प्रा . सदानंद रेगे लिहितात .
'अक्षरवेल', 'गंधर्व' व 'देवापुढचा दिवा' या त्यांच्या तीन कविता-संग्रहांना महाराष्ट्र सरकारचे पुरस्कार मिळाले. कथालेखक रेगे नंतरच्या काळात पूर्णपणे कवितेत रमले. नॉवेच्या भेटीने एका नव्या काव्यविश्वाचा त्यांना परिचय झाला व त्यांच्या कवितेलाही नवा बहर आला. श्री. रेगे यांच्या कवितांचे प्रातिभाविश्व हे जबरदस्त आहे.
मराठी कवितेत रांगोळी किती तऱ्हेने आली. परंतु  श्री. रेगे न्यायमूर्तीच्या घरासमोर रांगोळी काढण्यास बसले आहेत.
'यापुढे आम्हीच तुमची
न्यायपत्रे लिहित जाऊ.
तुम्ही फक्त तुमचा अंगठा
तेवढा मुकाट पुढे करायचा

नि आमच्या हातावरचं रक्त
लावून राजस मुद्रा ठोकायची .
एवढं कबूल करा,
न्यायमूर्ती,
तुमच्या दारापुढे रांगोळी काढू .
राखेला इथं काय तोटा ?'

Sunday, March 4, 2012

अक्षरवेल : ब्लर्ब

दुसरी आवृत्ती. मुखपृष्ठ- सुभाष पांगे
मराठी निसर्गकवितेत सदानंद रेगे यांनी विशेष भर घातली आहे. निसर्गातील विविध रंगगंध, ऊनसावल्या यांचा. चित्रमय गोफ या कवितांतून विणला जातो. त्यांच्या शब्दाशब्दांतून ‘तृप्त मनाच्या गर्भरेशमी श्रावणधारा’ मनात समृद्ध अनुभवांचे इंद्रधनुष्य निर्माण करतात. ख्रिस्ताच्या जीवनावर त्यांनी लिहिलेल्या कविता हे आधुनिक मराठी कवितेचे एक भूषण आहे. या कवितांत अपार कारुण्य आहे; पण भावविवशतेचा तिला स्पर्शही झालेला नाही. रेग्यांच्या सर्वच कवितांप्रमाणे याही कवितांत सखोल आशय आणि अल्पाक्षरत्व यांचा अपूर्व संगम आहे. परंतु ही कल्पकता नुसत्या बाह्य चमत्कृतीवर समाधान न मानता नित्यनव्या सौंदर्याचे दर्शन घडवते. रेग्यांच्या शब्दकळेला, प्रतिमासृष्टीला सांकेतिकतेचा कुठेही काच नाही. पण तिचे स्वतःचे असे अंतःसंगीत आहे, सौंदर्यविश्व आहे. रेग्यांच्या कथांप्रमाणेच त्यांची कविताही व्यक्तित्वसंपन्न आहे. आजच्या मराठी कवितेतील एक अभिमानाचं स्थान म्हणून त्यांच्या कवितेचा उल्लेख करावा लागला.

गंधर्व : ब्लर्ब

पॉप्युलर प्रकाशन. मुखपृष्ठ- बाळ ठाकूर
१९६० मध्ये प्रथम प्रसिद्ध झालेल्या काव्यसंग्रहाची ही दुसरी आवृत्ती (१९९२). सदानंद रेगे यांच्या व्यक्तित्वाची ठेवणच स्वतंत्र असल्यामुळे त्यांचे अनुभवविश्वही तेवढेच स्वतंत्र असणे स्वाभाविक आहे. प्रस्तुत काव्यसंग्रहातील कवितांतून त्यांच्या प्रतिभेचे रूपदर्शन घडते. जाणिवांच्या चक्रव्यूहातून जाताना रेग्यांची प्रतिभा एवढ्या दृत गतीने व सफाईने पदन्यास करीत जाते की तिच्याबरोबर धावता धावता मनाला भोवळ यावी कधी ती एवढी व्यापक होते, कधी आपणास एवढ्या उंचीवर घेऊन जाते की त्यानंतर आपल्या सामान्य जाणिवांच्या जगात परतताना एक मानसिक हादरा सहन करावा लागतो; कधी तिच्यातील सौंदर्यरूप झालेली अपार कणव शब्दाशब्दातून मनात ठिबकू लागते. रेग्यांच्या या नाजूक व रसरसलेल्या जाणिवा मनातून देखणा अंकूर फुटावा इतक्या सहजतेने व्यक्त होतात. स्वतंत्र जाणिवा आणि त्यांची स्वतःची अशी अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अभिव्यक्ती यांमुळे रेग्यांची कविता जीवनाशी एक नाते निर्माण करते.

वेड्या कविता : ब्लर्ब

पॉप्युलर प्रकाशन. मुखपृष्ठ - बाळ ठाकूर
प्रिय रेगे
पंधरा एक दिवसांपूर्वी तुमची कितीतरी दिवसांनी अचानक गाठ पडली. तुमच्या हातात तेव्हा ‘वेड्या कविता’ या तुमच्या नव्या संग्रहाचे हस्तलिखित होते. भीतभीतच ते हस्तलिखित दोन चार दिवसांसाठी तुमच्याकडून मागून घेतले आणि काहीशा अनिच्छेने का होईना, पण ते विश्वासपूर्वक तुम्ही दिलेतही. गेल्या काही दिवसांत त्यातील कविता वाचण्यापलीकडे मी इतर काही करू शकलेलो नाही.

तुमच्या ‘वेड्या कविता’ वाचल्यानंतर प्रथम क्षणीच हे जाणवले की, इतक्या ‘शहाण्या कविता’ मराठीत क्वचितच लिहिल्या गेल्या आहेत. या कवितांतील विषय आणि आशय, घाट आणि बांधणी, प्रतिमांचा वापर, मिथचा उपयोग तुमच्या इतक्या यशस्वीपणे अपवादात्मकच झालेला आहे. सर्वार्थाने या कविता मराठी साहित्यप्रांती खऱ्याखुऱ्या ‘नवीन’ आहेत आणि प्रतिभाविष्काराच्या कक्षा त्यांनी निःसंशय विस्तृत केल्या आहेत. एका परीने तुम्ही आपल्या माध्यमाच्या सांकेतिक मर्यादा ओलांडून अनेक वेळा त्यांच्या पलीकडेही पावले टाकण्याचे धैर्य दाखविले आहे. गेली तीन तपे तुम्ही अव्याहतपणे काव्यलेखन करीत आहात आणि अजूनही तो स्त्रोत नवनवोन्मेषांनी अप्रतिहत खळखळत आहे; ही आनंदाची गोष्ट आहे.

प्रस्तुत संग्रहातील ‘वेड्या कविता’, ‘चिनी कविता’, किंग लिअरवरील दीर्घ कविता, मर्ढेकर, दिवाकर, बालकवी, गडकरी, रावसाहेब पटवर्धन, आरती प्रभू यांजवरील कवितांनी प्रत्येक वेळी मन नुसते सुन्न करून टाकले. कितीही वाचल्या तरी मनाचे पुरते समाधान होऊ शकले नाही. बालकवींवरच्या कवितेने तर अक्षरशः भुताटकीच केली... या संग्रहातील प्रत्येक कविता मराठी भाषेचे आगळे लेणेच ठरावे. असेच नवनवोन्मेषशाली लिहीत रहा.
                                                                     
आपला
XX

'वेड्या कविता'ची अर्पणपत्रिका

Saturday, March 3, 2012

ज्यांचे होते प्राक्तन शापित

पॉप्युलर प्रकाशन, १९६५
ब्लर्ब
शोकात्मिकेचे मर्म समजावून देताना शोपेनहॉवरने म्हटले आहे, ''यातील नायक ज्या पापाचे प्रायश्चित्त भोगतो ते त्याने स्वतः केलेले नसते. आदिमानवापासून चालत आलेला 'मूळ पापा'चाच तो वारसा असतो. जन्मास येणे हेच ते पाप होय.''

'ज्यांचे होते प्राक्तन शापित' या नाट्यत्रयीत ओनीलने हाच विचार प्रामुख्याने मांडला आहे. या नाटकातील नायिका क्रिस्टिन कळवळून विचारते : ''आपली प्रेमळ, निष्पाप, निरागस वृत्ती सतत टिकून रहात नाही, असे का?'' अन् तीच स्वतः या प्रश्नाचे उत्तर देते : ''पण देव नाही आपल्याला असे मोकळे सोडणार! इतरांच्या आयुष्याशी आपल्या आयुष्याची अशी काही विचित्र गाठ तो बांधून ठेवतो की, त्यामुळे होणारी मनाची पिळणूक आणि त्याच्या वेदना यांमुळे वैतागून आपण अखेर एकमेकांच्या जिवावरच उठतो!''
या नाटकाचे तीन भाग ओनीलने आपल्या ऐन उत्कर्षाच्या काळात लिहिले आहेत. त्यातील मानसिक अस्वस्थतेचा आविष्कार आणि त्याचे यथायोग्य दर्शन घडविणारे नाट्यतंत्र, या दोन्हींमुळे ही नाटके अतिशय परिणामकारक झाली आहेत.

ग्रीक पुराणातील अॅगॅमेम्नन, क्लिटेम्नेस्ट्रा, ओरिस्टिस व इलेक्ट्रा यांच्या सुप्रसिद्ध कथेची एका नव्या दृष्टिकोणातून केलेली गुंफण या नाट्यत्रयीत पाहावयास मिळते. मूळ कथेतील भीषण नाट्यामुळे, सॉफक्लीज, एस्किलस आणि यूरिपिडिस् या तीन महान ग्रीक नाटककारांनी त्यांवर नाटके लिहिली आहेत. आधुनिक काळातही या कथेचा मोह अनेक नाटककारांना पडला आहे. पण ओनीलइतके यश याबाबतीत क्वचितच एखाद्या नाटककाराला लाभले असेल नसेल.

Friday, March 2, 2012

सदानंद रेगे यांचे काव्यविश्व

म. सु. पाटील यांनी ‘सदानंद रेगे यांचे काव्यविश्व’ (प्रतिमा प्रकाशन, पुणे) असं एक पुस्तक लिहिलंय. रेग्यांच्या कवितांचा अर्थ, त्यातल्या प्रतिमा, विषय असा एक आढावा सव्वाशे पानांच्या नि चाळीस रुपये किंमत असलेल्या या पुस्तकात आहे. पुस्तकाची आवृत्ती १० ऑक्टोबर १९८९ला प्रकाशित झाली होती.
या पुस्तकातला अगदीच थोडा भाग संदर्भासाठी आणि थोड्याशा स्पष्टीकरणासाठी इथे –


    या अभ्यासात जाणवलेली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रेगे हे फार सचोटीने लिहिणारे कवी आहेत. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रेगे हे फार सचोटीने लिहिणारे कवी आहेत. काव्य हा जणू त्यांनी स्वात्मसाधनेसाठी निवडलेला उपासनामार्ग आहे. पारमार्थिक साधनेत माणसाला बद्ध, मुमुक्षू, साधक या अवस्थांतून जावे लागते. या साधनेत जी बद्धतेची जाणीव असते तीतच तीमधून बाहेर पडण्याच्या इच्छेचे, मुमुक्षेचे बीज असते. मुमुक्षा म्हणजे मोक्षाची इच्छा, बद्धतेतून मुक्त होण्याची, तिच्यावर मात करण्याची, तिच्या पलीकडे जाण्याची, अतीत होण्याची इच्छा. पण केवळ अशी इच्छा असणे पुरेसे नसते. ती कृतीमध्ये परिणत व्हावी लागते. अशा इच्छेने केलेल्या कृती हीच माणसाची साधना असते. अशी साधना करणारे सगळेच साधक सिद्ध या अखेरच्या पायरीपर्यंत पोचतातच असे नाही; तरीही साधनेतून मिळणारे समाधान काही कमी नसते. रेगे यांनी आपल्या कवितांतून काव्याविषयीची आपली भूमिका स्पष्टपणे अशी कोठे मांडलेली नाही. त्यांचा शब्दांसंबंधीचा दृष्टिकोन मात्र एका कवितेत व्यक्त झालेला आहे. त्याचे निमित्त आहे हेंमिंग्वे या प्रसिद्ध अमेरिकी कादंबरीकाराचे पुढील शब्द :
‘Obscenity, I obscenity in the obscenity of thy obscenity.’
ते वाचून रेगे यांच्यामधील कवी विचारतो :
        शब्द बिचारे
        भोळेभाबडे असतात
        त्यांची एवढी परवड कशासाठीं?

                            (देवापुढचा दिवा)
आणि सांगतो
        डागळलेलीं अंगवस्त्रं मात्र
        त्यांवर टांगूं नका
        खुंट्या असल्या तरी
        त्या सतारीच्या आहेत
        शब्द...
        स्वरपुष्पांचे अक्षर झुबके...
        क्रौंचमिथुनाच्या वेळचें आर्त
        तुमच्या वृंदावनांत आणून टाकणारीं पाखरं.

                            (देवापुढचा दिवा)
यातील रूपके पाहिली की या कवीच्या शब्दांबाबतच्या संवेदनशीलतेची कल्पना येते. त्यात श्रद्धेचा सूर ठळकपणे जाणवतो. क्रौंचमिथुनाचा संदर्भ या माध्यमाच्या परंपरेचा जो आरंभबिंदू आहे त्याला स्पर्श करतो आणि त्या संबंधीची आपली साहचर्ये जागवतो. ‘कधीच नसलेली कविता’ (वेड्या कविता) या कवितेतील शब्दांबाबतचा दृष्टिकोन निराळा आहे. या कवितेचा आरंभ पुढीलप्रमाणे आहे.
        कोरा कागद
        त्याहून कोरंकरकरीत मन
        साऱ्या त्रिमितीत शब्द दबा धरून बसलेले
        केव्हा काय होईल याचा नेम नाही

हे चित्र निर्मितीच्या अगोदरच्या अवस्थेचे सूचक दिसते. त्यात एक विरोध आहे. एकीकडे कागद आणि मन यांचा कोरेपणा सगळीकडे सामसून झाल्याची सूचना देणारा आहे; त्या पार्श्वभूमीवर दबा धरून बसलेले शब्द अत्याचाराच्या तयारीत असल्यासारखे वाटतात. दुसरीकडे ‘कोरंकरकरीत मन’ हे ‘नथिंगनेस’च्या जाणिवेचे स्मरण करून देते. ते शून्यवत झालेले आहे, म्हणूनच त्याची एक नवी संभवशक्यता साक्षात होण्याची ही वेळ आहे असे वाटते. पण दबा धरून बसलेले शब्द तिचा गळा दाबतील की काय याचे भयही निर्माण होते, किंबहुना ते चराचर व्यापून टाकते. ही कल्पना देवकीची अपत्ये जन्माला येताच मारणाऱ्या कंसाच्या अनुयायांची आठवण करून देते. ‘कुठं तरी क्लिक होतं’ या प्रतिमेतून कवितेचा जन्म सूचित केला जातो. शेवटी झुडपांतून ऐकू येणारी जीवघेणी किंकाळी कवितेचा गळा घोटल्याची सूचकक बनते. येथे नवी संभवशक्यता आणि जुने शब्द किंवा तिला सामावून घेणाऱ्या माध्यमाचा अपुरेपणा, त्यामुळे त्याचा तिच्यावरील अत्याचार आणि परिणामी कवितेचे निर्जीवपण यासारखी एक जाणीव आविष्कृत होत असल्यासारखी वाटते.
रेगे हे आपल्या कवितेकडे इतक्या गांभीर्याने पाहतात. काव्यनिर्मितीची घटना ही त्यांना अस्तित्त्वानुभव देणारी घटना वाटते. अपत्यसंभवाच्या घटनेने स्त्रीचे अवघे अस्तित्व व्यापले जाते तसा अनुभव ते कवितेच्या निर्मितिघटनेत घेतात.

Thursday, March 1, 2012

प्रकाशित साहित्याची सूची

सदानंद रेग्यांचं प्रकाशित साहित्य-


कवितासंग्रह
अक्षरवेल, १९५७, पॉप्युलर प्रकाशन
गंधर्व, १९६०, पॉप्युलर प्रकाशन
देवापुढचा दिवा, १९८०, पॉप्युलर प्रकाशन
बांक्रुशीचा पक्षी, १९८०, श्रुती प्रकाशन
पँट घातलेला ढग (व्लादिमीर मायकोव्हस्कीच्या कवितांचा अनुवाद), १९८२, पॉप्युलर प्रकाशन
तृणपर्णे (वॉल्ट व्हिटमनच्या ‘लीव्हज् ऑफ ग्रास’चा अनुवाद), १९८२, साहित्य अकादमी

कथासंग्रह
जीवनाची वस्त्रे, १९५२, अभिनव प्रकाशन
काळोखांची पिसे, १९५४, पॉप्युलर प्रकाशन
चांदणे, १९५९, पॉप्युलर प्रकाशन
चंद्र सावली कोरतो, १९६३, पॉप्युलर प्रकाशन
मासा आणि इतर विलक्षण कथा, १९६५, पॉप्युलर प्रकाशन



अनुवाद
नाटके
जयकेतू (सॉफक्लीजच्या ‘ईडिपस रेक्स’चे रूपांतर), १९५९, पॉप्युलर प्रकाशन
ब्रान्द (हेन्रिक इब्सेनच्या ‘ब्रान्द’चा अनुवाद), १९६३, पॉप्युलर प्रकाशन
ज्याचे होते प्राक्तन शापित (युजीन ओनीलच्या ‘मोर्निंग बिकन्स इलेक्ट्रा’चा अनुवाद), १९६५, पॉप्युलर प्रकाशन
बादशहा (युजनी ओनीलच्या ‘द एम्परर जोन्स’चा अनुवाद), १९६५, पॉप्युलर प्रकाशन
गोची (ताद्रोझ रुझिविचच्या ‘गॉन आऊट’चे रूपांतर), १९७४, पॉप्युलर प्रकाशन
राजा ईडिपस (सॉफक्लीजच्या ‘ईडिपस रेक्स’चा अनुवाद), १९७७, पॉप्युलर प्रकाशन
पाच दिवस ( हेन्री झायगरच्या नाटकाचा अनुवाद), १९९१, पॉप्युलर प्रकाशन

कादंबऱ्या
चंद्र ढळला (स्टाईनबेकच्या ‘मून इज डाऊन’चा अनुवाद, दीनानाथ म्हात्रे यांच्यासह) १९४७
मोती (जॉन स्टाईनबेकच्या ‘पर्ल’चा अनुवाद) १९५०
बंड (जॉर्ज ऑर्वेलच्या ‘अॅनिमल फार्म’चा अनुवाद) १९५८
तांबडे तट्टू (जॉन स्टाईनबेकच्या ‘रेड पोनी’चा अनुवाद) १९६२
ससेहोलपट (लिन युटांगच्या ‘दी फाईट ऑफ दी इनोसन्ट्स’चा अनुवाद) १९६८

बालवाङ्मय
रडतोंडीचा घाट
चांदोबा चांदोबा (बालगीते), १९५९, पॉप्युलर प्रकाशन
झोपाळ्याची बाग, १९६५, पॉप्युलर प्रकाशन

इतर
रामायण (सी. राजगोपालाचारी यांच्या इंग्रजी ‘रामायण’चा अनुवाद), १९६३
हा अनुवाद ‘रहस्यरंजन’ मासिकात क्रमशः प्रसिद्ध होत होता.
***

ह्या सूचीसाठी प्र. श्री. नेरूरकर संपादित ‘अक्षरगंधर्व’ (पॉप्युलर प्रकाशन) नि वसंत आबाजी डहाके संपादित ‘निवडक सदानंद रेगे’ (साहित्य अकादमी) ह्या पुस्तकांचीच पूर्ण मदत घेतली. फक्त रामायणासंबंधी ‘रहस्यरंजन’चा उल्लेख ब्लॉग तयार करणाऱ्याने स्वतःच्या माहितीने टाकलेला आहे.

मित्र