‘निवडक सदानंद रेगे’ हे पुस्तक साहित्य अकादमीसाठी वसंत आबाजी डहाके यांनी संपादित केलंय. या पुस्तकाच्या प्रस्तावनेतला थोडासाच भाग डहाके यांच्या परवानगीने इथे दिला आहे. मूळ पुस्तक ९५ रुपयांना मिळतं. त्यात रेग्यांच्या काही कविता, कथा, लेख आहेत.
सदानंद रेगे यांचा जन्म २१ जून १९२३ रोजी राजापूर (जिल्हा- रत्नागिरी) येथे त्यांच्या आजोळी झाला असला तरी त्यांचे संबंध आयुष्य मुंबईत व्यतीत झाले. डिसेंबर १९३५मध्ये रेगे यांच्या वडिलांचे निधन झाले तेव्हा रेगे जेमतेम तेरा वर्षांचे होते. तिथून पुढे आई आणि भावंडांची जबाबदारी रेगे यांच्यावर पडली आणि ती त्यांनी विविध कष्ट उपसून पार पाडली. रेग्यांच्या वडिलांचे वाचन चांगले होते. त्यांनी आपल्या सुंदर हस्ताक्षरात विविध ग्रंथांची टिपणे काढून ठेवलेली होती. रेग्यांच्या हस्ताक्षरावर आणि चित्रकलेतल्या रसिकतेवर त्यांच्या वडिलांचे संस्कार झालेले आहेत. १९४०मध्ये मॅट्रिक झाल्यावर रेगे यांनी स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घ्यावा हे स्वाभाविकच होते. परंतु रंग, ब्रश, कागद इत्यादींचा खर्च आणि घरची स्थिती यांचा विचार करून त्यांना नोकरीच्या शोधात जावे लागले आणि चित्रकलेच्या शिक्षणाचा विचार बाजूला ठेवावा लागला. पुढे आयुष्याला स्थैर्य आल्यानंतर रेगे संगीताच्या आणि चित्रकलेच्या शिक्षणाकडे वळले. त्यांच्या काही पुस्तकांच्या मुखपृष्ठांवर त्यांनी केलेली रेखाचित्रे, रंगचित्रे आहेत. उदा. ‘ब्रांद’, ‘निवडक कथा’, इत्यादी. गिरणीत डिझायनर, केमिकल इंडस्ट्रीजमध्ये बिनपगारी उमेदवारी, पिशव्यांच्या कारखान्यात काम अशा फुटकळ नोकऱ्या केल्यानंतर त्यांनी पश्चिम रेल्वेत नोकरी धरली व ती अठरा वर्षे केली. १९५८ साली ते मराठी विषय घेऊन बी.ए. झाले आणि १९६१ साली ते इंग्रजी विषय घेऊन एम.ए. झाले. १९६२पासून २१ सप्टेंबर १९८२पर्यंत म्हणजे निधनापर्यंत त्यांनी रामनारायण रुईया महाविद्यालयात इंग्रजी विषयाचे प्राध्यापक म्हणून काम केले. या वीस वर्षांत त्यांची पंधराएक पुस्तके प्रकाशित झाली आणि विविध नियतकालिकांमधून विपुल असे स्फुट लेखन प्रकाशित झाले. हृदयविकाराचा झटका येऊन अल्पकालीन आजारानंतर त्यांचे निधन झाले. रेगे अविवाहित होते.
सदानंद रेगे यांच्या हयातीत त्यांची २८ पुस्तके प्रकाशित झालेली होती. त्यांच्या ‘अक्षरवेल’, ‘गंधर्व’, ‘देवापुढचा दिवा’ या कवितासंग्रहांना शासकीय पुरस्कार लाभला होता. रेगे यांच्या स्वतंत्र लेखनाप्रमाणेच त्यांनी केलेल्या अनुवादांनाही प्रतिष्ठा मिळाली. मायकॉव्हस्कीच्या ‘पँट घातलेला ढग’ या त्यांनी केलेल्या अनुवादित काव्यसंग्रहाला सोव्हिएत रशिया नेहरू पारितोषिक मिळाले होते. त्या निमित्ताने त्यांना १९७२मध्ये रशियाला जाण्याची संधी प्राप्त झाली होती. त्यापूर्वी १९६१मध्ये रेगे डॅनिश शिष्यवृत्ती घेऊन डेन्मार्कला गेले होते, नॉर्वेत काही काळ वास्तव्य केले होते. १९७८मध्ये इब्सेनच्या दीडशेव्या जन्मदिन महोत्सवात सहभागी होण्याचे निमंत्रण रेगे यांना मिळाले होते व या प्रकारे दुसऱ्यांदा नॉर्वेत जाण्याचा योग त्यांना प्राप्त झाला..
...
रेगे यांचे पहिले प्रकाशित पुस्तक म्हणजे दीनानाथ म्हात्रे यांच्या सहकार्याने त्यांनी केलेला स्टाइनबेक यांच्या ‘मून इज डाऊन’ या कादंबरीचा ‘चंद्र ढळला’ हा अनुवाद. तो १९४७ साली प्रकाशित झाला होता. पाठोपाठ स्टाइनबेकच्याच ‘पर्ल’चा ‘मोती’ हा अनुवाद १९५०मध्ये प्रकाशित झाला. रेगे यांचे पाश्चात्त्य वाङ्मयाचे वाचन चौफेर आणि अद्ययावत होते. कविता, कथा, कादंबरी, नाटक या वाङ्मय प्रकारातील लक्षणीय कृतींचे सरस अनुवाद त्यांनी केलेले आहेत. स्टाइनबेक, ऑर्वेल, लिन युटांग, मायकॉव्हस्की, वॉल्ट व्हिटमन, सॉफक्लीज, इब्सेन, युजीन ओनील, रुझिविच, लोर्का, नेरुदा, वॉलेस स्टीव्हन्स, इमेनेझ, खलिल जिब्रान इत्यादी लेखकांच्या निवडक कृतींची त्यांनी केलेली भाषांतरे पाहून त्यांनी वाङ्मयविषयक आस्था किती जबरदस्त होती याचा प्रत्यय येतो.
...
.. रेगे यांना साहित्य आणि कलांविषयी खोल आस्था होती. साहित्यिक, कलावंत यांच्याविषयी त्यांच्या मनात प्रेम होते, जिव्हाळा होता आणि भक्ती होती. त्यांच्या या भावनांचा आविष्कार विविध कवितांमधून झालेला दिसतो. मर्ढेकर, ठोंबरे, दिवाकर, केशवसुत, सार्त्र, काम्यू, काफ्का, मान्देलस्ताम, व्हॅन गॉफ, पॉल गोगँ, मॉदिन्लिआनी, सॉक्रेटिस, मार्क्स, मुंक, केसरबाई, गडकरी इत्यादी कविताविषय पाहिले की कलावंतांविषयी असलेल्या आस्थेचा प्रत्यय येतो. तसेच त्यांच्या लेखनातील संदर्भातूनही ही आस्था जाणवते. लिअर, हॅम्लेट, ऑफिलिया, केन, देवदास, इडिपस यांसारखे संदर्भ त्यांच्या कवितांतून सहजच येत राहतात. रेगे यांच्या कविताविश्वाचा हा एक घटक आहे. साहित्य किंवा चित्र या निव्वळ आस्वादाच्या गोष्टी नाहीत तर त्यांच्या संवेदनस्वभावाला घडवणारे व त्याचा अविभाज्य भाग असलेले घटक आहेत. पौर्वात्य आणि पाश्चात्य संदर्भ असलेल्या बाह्यतः मिश्र वाटणाऱ्या परंतु एकात्म असलेल्या वाङ्मयीन संस्कृतीचा ध्यास रेगे यांच्या मनाला लागलेला होता असे त्यांच्या विविध रचना पाहताना जाणवते.
...
१९५५च्या आसपास कथाकार म्हणून रेगे मराठी साहित्यविश्वात स्थापित झालेले असले तरी त्यांना खरा लौकिक मिळाला तो कवितेने. त्यांच्या कथांमधली काव्यात्मता आणि प्रतिमाव्यापार कवितेत सहज अंगभूत भाग म्हणून येऊन लागला. कवितेत रेग्यांना आपल्या लेखन स्वभावाचे मर्म सापडले.
सदानंद रेगे यांचा पहिला कवितासंग्रह ‘अक्षरवेल’ १९५७ साली प्रकाशित झाला.
.. त्यांचे काव्यलेखन १९४८पासून सुरू झालेले होते. तत्कालीन ‘अभिरुची’, ‘सत्यकथा’, ‘वाङ्मयशोभा’, ‘वसंत’ इत्यादी नियतकालिकांतून त्यांच्या कवितांना प्रसिद्धी मिळत होती. कल्पनाचमत्कृती, प्रतिमांचे नाविन्य, भाववृत्तींची सरलता, सूक्ष्मता ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये सहज जाणवतील अशी होती. ‘अक्षरवेल’ या संग्रहात प्रामुख्याने निसर्गकविता आहे. या कवितांमध्ये निसर्गाचे सुंदर शब्दात केलेले वर्णन नाही किंवा मानवी भावनांचा आरोप नाही. कवीच्या भाववस्थेत त्याला जाणवलेले निसर्गरूप प्रतिमांच्या भाषेत व्यक्त झालेले आहे.
उदाहरणार्थ-
आला श्रावण
गुच्छ रंगांचे घेऊन
ऊनपावसाचे पक्षी
आणि ओंजळीतून
इथे दृक्प्रतिमेतून श्रावण मूर्त होतो. पुढे या कवितेत ‘आता धरतील फेर / कवडशांची डाळिंबे’ अशी आणखी एक अनोखी प्रतिमा येते. श्रावणाचे रंगगंधात्मक वर्णन कवीने केलेले आहे, ते नुसते ‘सृष्टिसौंदर्य’ही नाही. याचे कारण कवितेच्या मध्यभागी पुढील ओळी आहेत.
आता मेल्या मरणाला
जिती पालवी फुटेल
गोठलेल्या आसवांना
पंख नवीन येतील
या ओळींमुळे ही केवळ निसर्गकविता राहत नाही तर कवीची एक भावस्थिती प्रकट करणारी कविता ठरते.
...
केवळ कल्पनाचमत्कृती हे रेगे यांच्या कवितेचे एकमेव वैशिष्ट्य नाही, त्यांच्या कवितांमधून अनुभव आणि विचार व्यक्त होतो, जीवनविषयक दृष्टी व्यक्त होते, ही दृष्टी सुखदुःखात्म आहे, या सुखदुःखात्म दृष्टीचे अनेक पैलू त्यांच्या कवितेतून व्यक्त होत असतात.
‘गंधर्व’ या कवितासंग्रहात ‘पोच’, ‘चित्र’, ‘तृप्त’ यांसारख्या प्रसन्न वृत्तीच्या आविष्कार करणाऱ्या थोड्या कविता आहेत. या संग्रहातल्या कवितांमधली मुख्य भावावस्था
वळणावरचा फकीर चाफा
त्याच्या मनात ठणकणारे
दुखरे गज्जल...
या ओळींतून व्यक्त झालेली आहे. तथापि याच संग्रहातल्या कवितांपासून कडवटपणाचे हास्यात रूपांतर करण्याची रेग्यांमधली प्रवृत्ती वाढीस लागलेली दिसते. या प्रवृत्तीचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘गंधर्व’ हीच कविता-
मी मरेन तेव्हा
येतील बाजाच्या पेटीतून
मोकळ्या हवेत
तीन झुरळी
अशी काहीशी विक्षिप्त सुरुवात असलेली ही कविता,
मी मरेन तेव्हा
वाचीन मी माझे धगधगते नाव
अश्रूंच्या फिरत्या तबकडीवर
सूरभिजली शाल पांघरून
निःशब्दाची
या ओळींवर येऊन थांबते. विक्षिप्तपणा, विदूषकी वृत्ती अथवा औपरोधिक दृष्टी हा रेग्यांच्या कवितेचा एक स्तर आहे. त्याखाली आयुष्यातला कडवटपणा, खोल दुःख लपलेले असते.
***
डहाकेंनी रेग्यांच्या कवितेसंबंधी जे प्रस्तावनेत लिहिलंय, त्यातला काही भाग इथे दिला आहे, मूळ प्रस्तावनेत रेग्यांच्या कथा, अनुवाद यांविषयीही डहाकेंनी लिहिलं आहे.